भार | मराठी हृदयस्पर्शी कविता
भार झाला काळजाला, दगडाचा थेंब झाला,
श्वासाच्या या ओझ्यानं, जीव आतून गिळला ।।
रात्र आली कवटाळी, अंधार गहिरा दाटे,
चंद्रही ढगात हरवा, वाटे सर्वदूर काटे।।
रानातल्या पानांनाही,, हुंदका फुटे हळवा,
दुःखा नको माझ्या गावा, रक्ताळला जीव पावा ।।
मातीशीच बोली मी ही, तीच आता सोबती,
जखमांच्या वणव्यात, जळती माझी छाती ।।
काळजाचा हा भार, कुणा सांगू रे मी आता?
जगता जगता मेला, जीव हरवला वाटा ।।
- कवी प्रशांत सर © (संगमनेरकर)
(© कवी प्रशांत सर (संगमनेरकर), २०२६ या कवितेचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय या कवितेचा कोणताही भाग कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा वापर करता येणार नाही.)
भावार्थ :
या कवितेत मी माझ्या अंतर्मनावर साचलेल्या वेदनांचा भार व्यक्त करतो. हा भार इतका जड आहे की, तो माझ्या अस्तित्वालाच कुरतडतो आहे, अशी माझी जाणीव आहे. प्रत्येक श्वास ओझं बनून मला आतून संपवत आहे, हे मी अनुभवतो. बाह्य जगातली रात्र आणि अंधार हे केवळ दृश्य नसून, माझ्या मनातल्या गडद नैराश्याचं प्रतिबिंब आहे. मी इतका एकटा झालो आहे की, मातीशीच संवाद साधावा लागतो. तीच माझी सखी बनते. या वेदना कुणाला सांगाव्यात, हा प्रश्न मला सतावतो. म्हणूनच मी म्हणतो. मी जिवंत असूनही आतून हरवलो आहे; हा माझ्या अस्तित्वाचा हळवा, पण तीव्र आक्रोश आहे.
📖 अशाच प्रकारच्या कविता वाचण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा
