स्वप्न आणि दिस | वास्तव कविता
स्वप्न कसं आहे? जसा आभायचा रंग,
डोळे मिटले की येई, मना जिवाशी खेळगं ।।
पंख फुटती मनाला, उडे आभायात पार
पण जाग येता क्षणी, लागे मातीचा आधार।।
उन्हातल्या साउलीला, म्हणू नये रे विश्रांती,
स्वप्न म्हणजे तहानं, वास्तवाची ही रे माती।।
पेरल्यावाचून पोत, स्वप्न कधी ना भरलं,
घाम गाळला भुईत, तेव्हा सत्य फळा आलं ।।
दोन्ही डोळ्यांच्या पाळण्या, स्वप्न झोके जरी घेई,
कष्टाविना त्याला कधी, गोड दुध-दुभतं नाही।।
नको भुलू सावल्यांना, ऊन सोसावेच लागे,
स्वप्न सत्य तेव्हा होते, जेव्हा माणूस हा जागे।।
अरे स्वप्न वास्तवाचा, खेळ मांडला देवानं,
एक आभायाचा तुकडा एक काळी आई मान ।।
स्वप्न पहावं डोळ्यानं, हात कामात असावे,
तेव्हा जगण्याचे गाणे, ओठावरी गोड यावे ।।
- कवी प्रशांत सर © (संगमनेरकर)
(© कवी प्रशांत सर (संगमनेरकर), २०२६ या कवितेचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय या कवितेचा कोणताही भाग कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा वापर करता येणार नाही.)
भावार्थ :
या कवितेत मी स्वप्न आणि वास्तव यांच्यातील नातं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. स्वप्न मला आभाळासारखं वाटतं. असीम, रंगीबेरंगी आणि मोहक; पण जाग आली की वास्तवाची माती पायाला धरून ठेवते, ही जाणीव मी मांडतो. केवळ स्वप्न पाहून काही साध्य होत नाही, तर त्यासाठी कष्टांची जोड आवश्यक आहे, हा माझा ठाम विचार आहे. पेरल्याशिवाय पीक येत नाही, त्याचप्रमाणे घाम गाळल्याशिवाय स्वप्न सत्यात उतरू शकत नाहीत. मी स्वतःला आणि वाचकाला सावध करतो. भ्रमात न राहता वास्तव स्वीकारावं. कारण स्वप्न आणि वास्तव यांचा समतोल साधला, तरच जीवन गोड होतं, ही माझी अंतर्मनातून आलेली जाणीव आहे.
📖 अशाच प्रकारच्या कविता वाचण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा
