About Us

About Us

मी प्रशांत कासार कवी, ग्राफिक्स डिझायनर आणि प्रवासातून स्वतःला शोधणारा एक साधा माणूस.

कवी प्रशांत कासार – लेखन, ग्राफिक्स डिझाईन आणि आत्मशोधाचा प्रवास दर्शवणारी साहित्यिक प्रतिमा

                                 शब्द हे माझ्यासाठी केवळ माध्यम नाहीत, तर ते माझं जग आहे. कविता ही माझी अभिव्यक्ती आहे. मातीच्या सुगंधासारखी नैसर्गिक, आणि मनाच्या खोलवर रुजलेली. प्रत्येक ओळीतून मी जीवनाचं सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो. कधी वेदना, कधी प्रेम, तर कधी न बोललेली शांतता. ग्राफिक्स डिझाईनिंग हा माझा आवडीचा विषय आहे. सर्जनशीलतेला नवं रूप देणं मला आवडतं. आयुष्यात अनेक अनुभव घेतले. शेतीपासून दुकानदारीपर्यंत, हमालीपासून कंपनीच्या नोकरीपर्यंत. प्रत्येक टप्प्याने मला घडवलं, शिकवलं आणि अधिक मजबूत केलं. सध्या आफ्रिकेत एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत आहे. लोकांच्या प्रवासाला दिशा देताना, मी स्वतःही नव्या अनुभवांच्या शोधात पुढे जात आहे. माझं लेखन साधं आहे, पण मनाला स्पर्श करणारं आहे. कारण मला विश्वास आहे. खऱ्या भावना कधीही अलंकारांची गरज भासत नाही. आयुष्य सतत बदलत राहतं… आणि त्या बदलांमधूनच माणूस स्वतःला नव्याने ओळखत जातो. प्रत्येकाचं आयुष्य हे एका मोठ्या पुस्तकासारखं असतं. ज्यात असंख्य अनुभवांची पानं दडलेली असतात. तसंच माझंही आहे… आणि म्हणूनच, मी शब्दांमध्ये स्वतःला शोधत राहतो.

                                   कोवळ्या उन्हातल्या फुलझाडाची एक फुलकळी प्रखर उन्हातही ताजीतवानी होऊन उमलते; पण तीच प्रखरता सहन करत करत एक दिवस ती वाळून जाते. दुसऱ्याला आनंद देण्याच्या नादात स्वतःचं अस्तित्व कधी संपतं, हे तिला कधीच कळत नाही. म्हणूनच स्वतःला हरवू नये, स्वतःला व्यक्त करता यावं म्हणून हा लेखनप्रपंच उभा केला आहे. अनेक विषय, अनेक भावना, अनेक विचार आणि अनुभव एकत्र गुंफताना अव्यक्त मनाला व्यक्त करणं. हाच एकमेव उद्देश ठेवून मी लिहित आलो आहे. हा प्रवास फक्त लेखनाचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे. जिथे प्रत्येक शब्दामागे एक अनुभव आहे आणि प्रत्येक ओळीत एक सत्य दडलं आहे. गेल्या कित्येक काळापासून हा लेखनप्रपंच मांडत आहे आणि अजूनही त्यातून प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय. जे वाटतं ते लिहितो. कोणाला आवडो किंवा न आवडो, कारण स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे.

                                माझी स्वप्नं साधी आहेत. आई-वडिलांनी दिलेले संस्कार माझ्यात रुजले; तसेच ते इतरांच्या मनातही रुजावेत, हीच इच्छा. लोकांनी माझं नाव घ्यावं, यापेक्षा माझ्या वागण्यातून कोणाला तरी प्रेरणा मिळावी. हेच खरं समाधान. चारित्र्य निर्मळ ठेवणं, आणि प्रत्येक दिवशी थोडं अधिक चांगलं माणूस बनणं. हीच माझी खरी ध्येययात्रा.

                               आज या वेबसाइटच्या माध्यमातून माझं वैचारिक व्यासपीठ जगासाठी खुलं करत आहे. जिथे तुम्हाला भावना, विचार, वास्तव आणि तत्त्वज्ञानासोबत कदाचित तुमचंच प्रतिबिंब सापडेल.

📌 मी कोण?

हा प्रश्न तुम्हाला पडला असेल,

तर खालील लिंकवर क्लिक करून वाचा

📖 येथे क्लिक करून वाचा

माझ्याशी जोडलेलं रहा

YouTube | Instagram | Facebook

(खालील आयकॉनवर क्लिक करा)

टिप्पणी पोस्ट करा