शेवटची मीठी - आई | मराठी कविता

शेवटची मीठी - आई | जबलपूर क्रुझ दुर्घटना | मराठी कविता 

पाण्याच्या गर्भात काळाने डोळे मिटले।
लाटांच्या कुशीत जीवांचे दीप विझत गेले।।

ती मात्र उभी शेवटच्या क्षणाची राखणदार।
लेकरू कुशीत, जणू मृत्यूशीच चालला व्यवहार।।

श्वासांचा व्यापार झाला क्षणांनी किंमत मोजली।
आईने स्वतःची वाट अंधाराला अर्पण केली।।

हातांच्या वर्तुळात तिने विश्व घट्ट बंद केलं।
मी आहे या शब्दांनी अंतही अमरत्वात बदललं।।

नदी शांत झाली, पण तळाशी जखम जागी आहे।
त्या मिठीत अजूनही काळाची साक्ष दडली आहे।।

मृत्यू जिंकला म्हणणं ही जगाची चूक ठरेल।
कारण शेवटी हरला तोच… जिथे आईचा स्पर्श उरेल।।

                                       - कवी प्रशांत सर © (संगमनेरकर)


(© या कवितेचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय या कवितेचा कोणताही भाग कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा वापर करता येणार नाही.)
शेवटची मीठी आई मराठी कविता – आईचे प्रेम, बलिदान आणि मृत्यूवर मात करणारा स्पर्श दर्शवणारी भावनिक प्रतिमा

भावार्थ :
                    ही कविता एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या वास्तव प्रसंगावर आधारलेली आहे, जो मध्यप्रदेशातील जबलपूर येथे नर्मदा नदी वर झालेल्या बोट/क्रूझ दुर्घटनेत घडला. या अपघातात अनेक जीव पाण्यात वाहून गेले; पण त्या काळजाला भिडणाऱ्या दृश्यात एक आई आपल्या लेकराला शेवटच्या श्वासापर्यंत कवटाळून होती, आणि दोघांचेही मृतदेह एकत्र सापडले. कवितेत पाण्याचा प्रलय हा जीवनाच्या क्षणभंगुरतेचं प्रतीक आहे, तर आईचं न ढळणारं उभं राहणं हे मातृत्वाच्या अढळ शक्तीचं दर्शन घडवतं. त्या क्षणी आईसाठी स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा जीव सगळं गौण ठरतं. तिच्यासाठी अंतिम सत्य एकच उरतं. आपल्या लेकराचं रक्षण. म्हणूनच ती मृत्यूशी जणू निःशब्द करार करते, जिथे स्वतःचा त्याग करून ती लेकराला आपल्या कुशीत सुरक्षित ठेवते. ‘हातांच्या वर्तुळात विश्व बंद करणं’ ही प्रतिमा आईच्या त्या संरक्षणात्मक कवचाची आहे, जिथे तिच्या मिठीत लेकरासाठी संपूर्ण जग सामावलेलं असतं. “मी आहे” हा तिचा न उच्चारलेला शब्द, शेवटालाही अमरत्वात बदलतो. तिच्या स्पर्शात अशी एक अद्भुत शक्ती आहे, जी मृत्यूच्या सीमांनाही ओलांडते. शेवटी नदी शांत होते, सर्व काही स्थिर होतं पण त्या घटनेची जखम काळाच्या तळाशी कायमची जिवंत राहते. ही कविता सांगते की मृत्यू शरीर संपवू शकतो, पण आईचं प्रेम कधीच संपत नाही. म्हणूनच मृत्यू जिंकला असं म्हणणं ही चूक ठरते कारण जिथे आईचा स्पर्श उरतो, तिथे मातृत्वाचं अमरत्व सदैव जिवंत राहतं.

📖 अशाच प्रकारच्या कविता वाचण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने