मी कोण ? | माझी ओळख | कवी प्रशांत सर

मी कोण ? | माझी ओळख

मी कोण?  तुमच्यातलाच एक हरवलेला माणूस.
एक अव्यक्त.. आणि एक अनंत.

कवी प्रशांत सर आत्मकथन – संघर्ष, जीवनप्रवास आणि व्यक्त होण्याची कथा दर्शवणारी मराठी साहित्यिक प्रतिमा


                                     अनंत यासाठी की, एकाच वेळी अनेक विचारांचा काहूर मनात दाटलेलं असतं. तसं प्रत्येकाच्या मनात असतं, पण प्रत्येकाला ते शब्दात उतरवता येत नाही. आणि मी वेडा, भाबडा… मनात येईल ते कागदावर लिहीत जातो. माझं नाव प्रशांत कासार. सर्वत्र “कवी प्रशांत सर” म्हणून ओळख आहे. मी मूळचा संगमनेरचा म्हणून “संगमनेरकर” ही ओळख. संगमनेर मधील निमज नावाचं माझं छोटंसं गाव, प्रवरेच्या तीरावर वसलेलं आणि चहुबाजूंनी मंदिरांची आध्यात्मिक श्रीमंती लाभलेलं. व्हिक्टोरिया क्रॉस नामदेव जाधव यांचा माझ्या गावात जन्म झाला होता. एवढाच एक जुना इतिहास मला माहित आहे. माझं कुटुंब जुन्या काळी फार मोठं होतं, असं म्हणतात. आजोबा फार कष्टाळू होते, त्यांनीच आमच्या संपूर्ण घराण्याची धुरा सांभाळली. त्यांना चार मुलं त्यातील सगळ्यात लहान मुलगा, आणि त्यांचा मी सगळ्यात छोटा चिरंजीव.

                           माझ्या बालपणी आमची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. माझ्या वडिलांना fits (epilepsy) आजार होता. त्यात जुन्या काळी सासू-नणंद नव्या सुनेला जसा त्रास द्यायच्या, तसंच चित्र माझ्या आईसोबत होतं. नवऱ्याची अशी अवस्था, त्यात सासरचा त्रास, आणि तीन मुलं मी, माझा मोठा भाऊ आणि मोठी बहीण. कसं तरी दुसऱ्याच्या शेताच्या बांधावर जाऊन घर चालत होतं. माझे वडील खूप चांगले होते. वारकरी भजनाला बसल्यावर सगळ्या गावात कुणाचा असा आवाज नाही. असा आवाज होता माझ्या वडिलांचा. देवाचं इतकं वेड… विचारू नका. पण शेवटी म्हणतात ना जे सगळ्यांना आवडतात, ते देवालाही आवडतात… म्हणूनच वडिलांचं छत्र आमच्या डोक्यावरून लवकर हरपलं.

                         मी तेव्हा साधारण सात वर्षांचा असेल. वडिलांची मानसिक स्थिती बिघडलेली… माराच्या काचामुळे एखादं लेकरू कायमचं संपेल या भीतीने आईने आम्हा तिघा भावंडांना घेऊन मामाचं गाव गाठलं. त्यानंतर गावच्या लोकांनी वडिलांची अवस्था बघून या माणसापासून लोकांना धोका आहे हे ओळखलं आणि वडिलांना जेलमध्ये पाठवलं. आईने आमच्या तिघांच्या शिक्षणासाठी दररोज दुसऱ्याच्या शेतावर काम केलं. मला आठवतं. तेव्हा रोज फक्त २५ रुपये मिळायचे. आम्ही आमच्या आजीकडे राहत होतो. आजीही श्रीमंत नव्हती. तिच्या नवऱ्याने दोन लग्न केलेले… ती वनीकरणाच्या कडेला झोपडी बांधून राहत होती.काही दिवस तिने आमचा सांभाळ केला. नंतर आईच्या चुलत आजोबांनी त्यांचं एक घर आम्हाला राहायला दिलं आणि आम्ही तिथे राहायला लागलो. आई रोज कामाला जायची.
                            शनिवार-रविवार दादा आणि ताईही तिच्यासोबत कामाला जायचे. आईला जितका रोज मिळायचा, त्याच्या अर्ध्या रोजात ताई आणि दादाही काम करायचे. तरीही घर चालत नाही हे बघून माझ्या पाचवीनंतर मला इंदुरीकर यांच्या आश्रमात टाकलं. हो तेच इंदोरीकर निवृत्ती महाराज देशमुख. कायम आईच्या पदराखाली राहणारा मुलगा अचानक एकांतात पडला… आणि अजूनही एकटाच आहे. एक वर्षभर त्या आश्रमात राहिलो. आध्यात्मिक गोडी लागली नाही असं नाही. वडिलांकडून आलेली धार्मिक ओढ आमच्याही रक्तात आहेच. पण त्या वर्षभरात काही शिकलो नाही, कारण कधी करमलंच नाही. त्याच वर्षी वडिलांना येरवडा जेलमधून सुट्टी मिळाली. ते घरी आले, पण त्यांचा आजार काही बरा झाला नव्हता.
                           आईची परिस्थिती अजूनच बिकट झाली. मग कोल्हापूरच्या आदमापूर मधल्या बाळूमामांनी हाक दिली. मंदिर ट्रस्टने वडिलांच्या उपचाराची जबाबदारी घेतली. पण तिकडेच रेल्वे अपघातात वडिलांचा मृत्यू झाला.लहानपणापासून आईनेच आम्हाला सांभाळलं. वडिलांचं प्रेम कधी मिळालंच नाही. फक्त एकच माहिती होतं. आमचा बाप खूप चांगला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही पुन्हा गावी आलो. हक्काच्या जमिनीचे वाद सोडवून शेती करायला लागलो. शिक्षणही सुरूच होतं. पण संघर्षात जी पोकळी होती ना ती भरून काढण्यासाठी मी शब्दांच्या नादी लागलो. नववी-दहावीला असताना पहिल्यांदाच लेखनाला सुरुवात केली. फार काही लिहिलं नाही. जसं येईल तसं, तोडकं-मोडकं. पण अकरावीनंतर पुस्तकांची ओळख वाढली आणि लेखन वेगळ्या टप्प्यावर वळलं. लेखनाचा उद्देश नाव कमावणं अजिबात नाही, व्यक्त होणं… हाच एक उद्देश.
                         व्यक्त होऊ लागलो, तसा समाज अधिक स्पष्टपणे उमगू लागला. थोडक्या, मोडक्या चारोळ्यांतून सुरू झालेला माझा प्रवास हळूहळू तत्त्वज्ञानाच्या गाभाऱ्यात शिरू लागला. Whatsapp , इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या माध्यमांतून मी स्वतःची ओळख मांडू लागलो; पण खरं सांगायचं तर ती ओळख माझी स्वतःची नव्हतीच. माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं, शरीराने अनुभवलं आणि मनाने साठवलेलं हे सगळं शब्दांतून उमटत गेलं, आणि त्या प्रक्रियेत माझं अव्यक्त कवीमन व्यक्त होत राहिलं. कधीच कवीसंमेलनांच्या मोहात पडलो नाही. शाल, नारळ, मोठ्या ट्रॉफ्या यांचा गाजावाजा मला कधी भावला नाही; कारण लेखन हे माझं व्यवसाय नसून, मन मोकळं करण्याचं साधन आहे. मी काय लिहितो, काय करतो यावर घरच्यांची नजर होतीच. “यातून काही मिळतं का?” असे प्रश्नही होते; अडचणीही होत्या. तरी एक गोष्ट ठाम होती. मन व्यक्त केल्याने कधीच मोठं नुकसान होत नाही. कारण प्रत्येकाला व्यक्त होता येत नाही, प्रत्येकाला नकारात्मकतेतून तत्त्वज्ञान शोधता येत नाही, प्रत्येकाला दिसणारं नेमकं आणि संयत शब्दांत मांडता येत नाही, आणि प्रत्येकाला शब्दांच्या आधारानं स्वतःचं अस्तित्व घडवता येत नाही.
                              मी मात्र हाच मार्ग निवडला. आयुष्यात अनेक प्रसंग आले, जातीलही; पण त्यांना प्रामाणिकपणे शब्दबद्ध करत राहीन. कारण लेखन म्हणजे स्वतःशी संवाद, आणि स्वतःशी खोटं बोलणं मला कधीच जमत नाही.

📌 about me

च्या वेबसाइटवर नक्की काय आहे ते तुम्हाला या पेजवरून कळेल,

तर खालील लिंकवर क्लिक करून वाचा..

📖 येथे क्लिक करून वाचा

माझ्याशी जोडलेलं रहा

YouTube | Instagram | Facebook

(खालील आयकॉनवर क्लिक करा)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने