निशब्द मित्र | पुस्तक दिन कविता
कागदाच्या गाभारी, शब्द झाले मौन,
या निशब्द मित्राचे, अजब आहे लक्षण.
जगाच्या कोलाहला, देई शांतीचा विसावा,
अनुभवांच्या स्पर्शाने, उजळला मनाचा दिवा.
साठवून काळजांत, युगायुगांचे हे संचित,
पानापानांत लपले, सत्याचे गूढ संगीत.
नाही कसली अपेक्षा, ना तक्रारीचा हा स्वर,
अंधाऱ्या वाटांवरती, होतो ज्ञानाचा ईश्वर.
मूर्तिमंत विचारांची, ही तर शांत समाधी,
सोडविते सहजपणे, मनाच्या सर्व व्याधी.
कधी भासे आरसा, कधी अथांग हा सागर,
शून्यातून विश्व दावी, असा शब्दांचा जादूगर.
या ग्रंथरुपी देहाचे, चैतन्य असते ओळीत,
जीवनाचे सार शोधे, जो हरवे या खेळीत.
बोलका हा अबोलपणा, काळजाला असा भिडतो,
निशब्द या मित्रात मग, स्वतःलाच माणूस सापडतो.
- कवी प्रशांत सर © (संगमनेरकर)
(© कवी प्रशांत सर (संगमनेरकर), २०२६ या कवितेचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय या कवितेचा कोणताही भाग कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा वापर करता येणार नाही.)
भावार्थ :
या कवितेत मी ग्रंथाला “निशब्द मित्र” म्हणून अनुभवतो. जो बोलत नाही, पण सर्व काही सांगतो. त्याच्या मौनात मला अनंत अनुभवांचे संचित सापडते, आणि त्या शांततेत माझं मन उजळून निघतं. बाहेरच्या कोलाहलापासून दूर नेऊन तो मला अंतर्मुख करतो, ही माझी जाणीव आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता तो मला सत्य दाखवतो, आणि अंधारातही मार्गदर्शक बनतो. कधी तो माझा आरसा होतो, तर कधी अथांग सागर ज्यात मी स्वतःलाच शोधतो. या शब्दांच्या जादूमुळे मी माझ्या मनाच्या व्याधींपासून मुक्त होतो. शेवटी मला उमजते. या निशब्द मित्रात हरवलो, की मी स्वतःलाच सापडतो.
📖 अशाच प्रकारच्या कविता वाचण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा
