ग्रंथ सखा | पुस्तक दिन कविता
नि:शब्द पानांतून वाहते, अथांग मौनाचे गाणे,
कागदाच्या कुपीत दडते, अनंत युगांचे शहाणे.
जड देहाच्या पलीकडे, जो चैतन्याची कवाडे उघडी
तोच सखा मित्र, जो अंधारा 'स्व' प्रकाश दाखवी.
बुद्धीच्या या चक्रव्यूहात, दाटुन जेव्हा संशय येतो,
ग्रंथ सखा तर्काच्या हाताने, सत्याचा मार्ग देतो.
ना पूर्वग्रह, ना अभिनिवेश, केवळ 'आहे' तेच सांगतो,
माणसातल्या पशूला मारून, विवेकाचा दीप मागतो.
पान पान उलटताना जणू, एक विश्व मागे सुटते,
अन पुढच्या शब्दातून पुन्हा, नवी सृष्टी प्रकटते.
शून्यापासून सुरू झाला, हा प्रवास एक खेळ आहे,
ग्रंथ म्हणजे मर्त्य मानवाचा, ईश्वराशी घातलेला मेळ आहे.
- कवी प्रशांत सर © (संगमनेरकर)
(© कवी प्रशांत सर (संगमनेरकर), २०२६ या कवितेचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय या कवितेचा कोणताही भाग कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा वापर करता येणार नाही.
भावार्थ :
या कवितेत मी ग्रंथाला केवळ वाचनसामग्री म्हणून न पाहता, माझ्या अंतरंगाचा खरा सखा मानतो. त्याच्या नि:शब्द पानांत मला अनंत काळाचे शहाणपण सापडते, आणि त्या मौनातूनच मी स्वतःला अधिक स्पष्ट ओळखतो. संशयाच्या चक्रव्यूहात अडकलो की, हाच ग्रंथ तर्काच्या आधाराने मला सत्याकडे नेतो, ही माझी जाणीव आहे. तो कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय वास्तव मांडतो, आणि माझ्यातील अज्ञानाला आव्हान देतो. प्रत्येक पान उलटताना मी एका नव्या विश्वात प्रवेश करतो. शेवटी मला उमजते. ग्रंथ म्हणजे माझ्या मर्त्य अस्तित्वाला दिव्यतेशी जोडणारा सेतू आहे; एक असा सखा, जो कधीच साथ सोडत नाही.
📖 अशाच प्रकारच्या कविता वाचण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा
